आसावल्या मनाला माझाच राग येतो
आसावल्या मनाला माझाच राग येतो
नाही कशी म्हणू मी येईलही पुन्हा तो
आसावल्या मनाला माझाच राग येतो
आमंत्राणाविना तो या जीवनात आला
आला तसाच गेला भुलवून भाबडीला
त्या दुष्ट आठवाने हृदयात दाह होतो
आसावल्या मनाला माझाच राग येतो
आता पराजितेला आधार कोण आहे
ह्या पांगळ्या कथेचे होणार काय आहे
शिशिरास सावराया म्हणती वसंत येतो
आसावल्या मनाला माझाच राग येतो
ताटातुटी टिकावी आता नकोत भेटी
तुटतात का परंतु ह्या घट्ट जन्मगाठी
माझे मला कळेना हा भास काय होतो
आसावल्या मनाला माझाच राग येतो