एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले
त्या कुणी ना पाहिले त्या कुणी ना पाहिले
मंद अगदी गंध त्याचा मंद इवले डोलणे
साधले ना मुळि तयाला नटुनथटुनी नाचणे
कोवळे काळिज त्याचे परि कुणिसे मोहिले
त्या कुणी ना पाहिले त्या कुणी ना पाहिले
त्या कुणाला काय ठावी या फुलाची आवडी
तो न आला या दिशेला वाट करुनी वाकडी
या फुलाला मात्र दिसली दुरुन त्याची पाउले
त्या कुणी ना पाहिले त्या कुणी ना पाहिले
एक दुसरे फूल त्याने खुडुन हाती घेतले
या फुलाचे जळून गेले भाव उभरे आतले
करपली वेडी अबोली दुःख देठी राहिले
त्या कुणी ना पाहिले त्या कुणी ना पाहिले
एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले
त्या कुणी ना पाहिले त्या कुणी ना पाहिले